Breaking News
स्वाक्षरी अभियान शुभारंभ प्रसंगी टोकियो ऑलिम्पिक खेळाडूंना आयुक्त व क्रीडापटूंनी दिल्या शुभेच्छा
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमधील विविध क्रीडा प्रकारांत भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरिता आयोजित "स्वाक्षरी मोहीम अभियान" शुभारंभ महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांच्या वतीने देण्यात आलेल्या मोठ्या स्वाक्षरी फलकावर आयुक्तांनी स्वाक्षरी करून तसेच सेल्फी पॉईटवर शुभेच्छापर छायाचित्र काढून 'ऑलिम्पिक डे' च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त संजय काकडे , मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, उपआयुक्त मनोज महाले व क्रांती पाटील यांनीही स्वाक्षरी फलकावर शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी व अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी व शुटिंगबॉलचे राष्ट्रीय कर्णधार रेवप्पा गुरव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सागरी जलतरणपटू शुभम वनमाळी, तायक्वांदो खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, विभागीय व्हॉलिबॉल असो. चे सरचिटणीस धनंजय वनमाळी आणि इतर खेळाडू उपस्थित होते.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्रातील १० खेळाडू तेजस्विनी सावंत (५० मी. रायफल शुटींग), राही सरनोबत (२५ मी. पिस्तूल शुटींग), चिराग शेट्टी (बँडमिंटन पुरूष दुहेरी ), प्रवीण जाधव (आर्चरी रिकर्व्ह), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स - ३००० मी. स्टीपलचेस), भाग्यश्री जाधव (पॅरा ॲथलेटिक्स - गोळाफेक), स्वरूप उन्हाळकर (पॅरा शूटींग १० मी. रायफल), सुयश जाधव (पॅरा स्विमींग ५० मी. बटरफ्लाय, २०० मी. वैयक्तिक मिडले), विष्णू सरवानन ( सेलींग लेसर स्टँडर्ड क्लास), उदयन माने (गोल्फ) यांना ऑलिम्पिकमधील उज्ज्वल यशासाठी समस्त नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
ऑलिम्पिक डे निमित्त नुकतीच महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबईतील १८ वर्षावरील राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कोव्हीड लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली असून यामध्ये ५६ क्रीडापटू व क्रीडा प्रशिक्षकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
रिपोर्टर