Breaking News
लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची संख्या कधी वाढणार?
२०२६ नंतर किंवा २०३१च्या जनगणनेनंतरच मतदारसंघांच्या संख्येत वाढ होईल, अशी चिन्हे आहेत. अर्थात, २०२६ मध्ये सत्तेत असलेल्या पक्षाची भूमिकाही महत्त्वाची असेल.
नवी दिल्ली : देशाची लोकसंख्या वाढली तरी त्या तुलनेत लोकसभा आणि विधानसभेतील प्रतिनिधीत्व कमी असल्याची चर्चा नेहमी होत असते. १९७१ला शेवटची रचना झाल्यापासून देशाच्या लोकसंख्येत जवळपास ७५ कोटींची भर पडली आहे. त्यामुळे आता जागांमध्येही वाढ करण्याची मागणी होत आहे. संसदेची नवी इमारत बांधताना खासदारांची संख्या वाढणार हे गृहित धरून सभागृहाची रचना करण्यात आली आहे. असे असले तरी २०२६ नंतर किंवा २०३१च्या जनगणनेनंतरच मतदारसंघांच्या संख्येत वाढ होईल, अशी चिन्हे आहेत. अर्थात, २०२६ मध्ये सत्तेत असलेल्या पक्षाची भूमिकाही महत्त्वाची असेल.
लोकसभा आणि विधानसभेच्या सध्याच्या मतदारसंघांची रचना कधी झाली होती ?
१९७१ च्या जनगणनेच्या आधारे लोकसभा आणि राज्यांमधील विधानसभेचे मतदारसंघ निश्चित करण्यात आले होते. या आधारे मतदारसंघांची संख्या निश्चित करण्यात आली. २००८ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली होती. १९७६ मध्ये मतदारसंघांची संख्या निश्चित करताना २५ वर्षानंतर पुन्हा फेरआढावा घेऊन मतदारसंघांची संख्या वाढविण्याची तरतूद ४२व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली होती. यानुसार २००१ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना आणि संख्या वाढली असती. पण २००१ मध्ये करण्यात आलेल्या ८४व्या घटना दुरुस्तीनुसार २०२६ पर्यत मतदारसंघांची विद्यमान संख्या कायम राहील. २०२६ नंतर किंवा त्यानंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची फेररचना करण्यात यावी, अशी तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच २०३१ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे मतदारसंघांची फेररचना केली जाण्याची शक्यता आहे.
मतदारसंघांची संख्या कधी वाढू शकते ?
८४व्या घटना दुरुस्तीनुसार २०२६ पर्यंत सध्याच्या लोकसभा आणि राज्य विधानसभेचे संख्याबळ गोठविण्यात आले आहे. यानंतरच संख्याबळ वाढविता येईल. २०२६ नंतरच्या पहिल्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना करावी, अशी तरतूद आहे. पण २०२६ मध्ये सत्तेत असलेल्या पक्षाकडून घटना दुरुस्तीच्या माध्यमातून संख्याबळ वाढविता येऊ शकते. तसे झाल्यास २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत संख्याबळ वाढू शकते.
रिपोर्टर