Breaking News
नवी मुंबई महानगरपालिकेचे जलसंपन्न मोरबे धरण पूर्ण भरले
नवी मुंबई : मागील आठवडाभर झालेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण पूर्ण भरलेले असून धरणातील जलसाठ्याने ८८ मीटर इतकी पूर्ण उंची गाठून आता दुथडी भरून वाहू लागलेले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना जलदिलासा लाभलेला आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असून मोरबे धरणाव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेकडे अनमोल अशी जलसंपत्ती आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी जलस्त्रोतावरील या धरण प्रकल्पाचा परिसर नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला असून माथेरानच्या प्रदूषणविरहित प्रदेशातून येणारा हा जलस्रोत असल्याने येथील पाणी मूलत:च शुध्द आहे.
प्रतिदिन ४५० द.ल.लि. क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प अविरत पर्जन्यवृष्टीमुळे संपूर्ण भरला असून ८८ मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी गाठलेली आहे. मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात यावर्षी आजतागायत ३७४८.६० मि.मी. पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत १९०.८९० द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरून वाहू लागल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे. आज मोरबे धरणाचे दरवाजे २५ सेमी ने उघडले असून ११२३ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरणे ही नवी मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने ही आनंदाची व समाधानाची बाब असल्याचे सांगत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आपण जलसमृध्द असलो तरी पाण्याचे महत्व ओळखून त्याचा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे असल्याचे आवाहन केले आहे.
रिपोर्टर