Breaking News
एफ जी नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून जागतिक एड्स जनजागृती दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर ८ येथील एफ जी नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून जागतिक एड्स जनजागृती दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले. कोपरखैरणे पोलीस स्टेशन येथील अजय भोसले वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी या रॅलीला संबोधन केले व हिरवा झेंडा फडकवून या एड्स जनजागृती रॅलीचे उद्घाटन केले. ही रॅली संपूर्ण कोपरखैरणे परिसरात फिरली ज्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक , अधिकारी, शिक्षक वर्ग समाविष्ट होते. या रॅली दरम्यान स्वयंसेवकांनी विविध एड्स रोग प्रतिबंधक घोषणा देत जनजागृती केली. या दिनानिमित्त आदल्या दिवशी पोस्टर मेकिंग स्पर्धा ही घेण्यात आली होती व त्या स्पर्धेतील सर्व पोस्टर्स या रॅलीमध्ये स्वयंसेवकांकडून हाती धरून रॅली मध्ये नागरिकांना प्रदर्शित करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजय भोसले वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोपरखैरणे पोलीस स्टेशन यांनी आपल्या संबोधनात विद्यार्थ्याचा या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल कौतुक केले , त्यांचा उत्साह वाढवला व अशा सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्याचा किती मोलाचा वाटा असतो हे अधोरेखित केले. त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिकसर यांचे अभिनंदन केले की त्यांच्या मार्गदर्शनाखाली असे विविध सामाजिक उपक्रम महाविद्यालय नवी मुंबईत राबवत असते व आपली सामाजिक बांधिलकी जपते. त्यांनी विद्यार्थ्याना अशा विविध उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांना प्रोत्साहित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिकसर यांनी सुद्धा सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांचे कौतुक करत या पुढील शैक्षणिक वर्षात ही त्यांनी अशीच कामगिरी बजावावी असे त्यांना आव्हान केले व महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना युनिट करत असलेले विविध सामाजिक उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले.
रॅलीच्या उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा.दत्तात्रेय घोडकेसर यांनी केले.सदर रॅलीमध्ये महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, अधिकारी डॉ. कविता पवार मॅडम व प्रा. प्रमोद साळुंखेसर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
रिपोर्टर