प्रारुप आराखडा बनविण्याचे निवडणुक आयोगाचे आदेश ; ३७ प्रभाग निश्चित
- by Irfan shaikh
- Oct 09, 2021
प्रारुप आराखडा बनविण्याचे निवडणुक आयोगाचे आदेश ; ३७ प्रभाग निश्चित
नवी मुंबई : राज्यातील आगामी महापालिकेच्या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या १११ राहणार आहे. एकूण ३७ प्रभाग राहणार असून प्रत्येक प्रभागात ३ नगरसेवक असणार आहेत. निवडणुक आयोगाच्या या आदेशाने पालिकेसह सर्व पक्षीय मंडळी कामाला लागली आहेत. नवी मुंबईत त्रिसदस्यीय पद्धती पहिल्यांदाच लागू केल्याने हा तीन तिघाडीचा खेळ कसा रंगणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
राज्य सरकारने यापुर्वीची एका प्रभागासाठी एक नगरसेवक ही पद्धती रद्द करुन बहुसदस्यीय प्रभाग पद्धती राबविण्याचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला. त्यातही शक्यतो तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्याचे सुचविल्याने तीन प्रभागावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने ५ ऑक्टोबर रोजी त्रिसदस्यीय पॅनेलप्रमाणे प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले असून तातडीने कच्चा प्रारुप आराखडा बनविण्यासाठी सुरुवात करण्यास सांगितले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार नवी मुंबई शहराची लोकसंख्या ११ लाख २० हजार ५४७ आहे. त्यात अनुसूचित जाती (एससी) १लाख ६७ तर अनुसूचित जमाती (एसटी) १८ हजार ९१३ लोकसंख्या आहे. पुर्वीप्रमाणेच १११ नगरसेवक असणार आहेत. एकूण ३७ प्रभाग राहणार आहेत. प्रत्येक प्रभागात ३ उमेदवार असणार आहेत. त्यामुळे मतदारांनाही तीन उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. या पद्धतीने एकाच ठिकाणी अनेक वर्ष ठाण मांडलेल्या नगरसेवकांसमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वच प्रभागात अदलाबदल होणार असल्याने संबंधितांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कोणता प्रभाग कोणाला मिळतोय त्यावरुन उमेदवार निवडले जातील. त्यामुळे एकाच घरातील दोनपेक्षा अधिक नगरसेवक असणार्या सदस्यांची गोची होण्याची शक्यता आहे.
निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के कमी किंवा १० टक्के जास्त या मर्यादेत प्रभागाची लोकसंख्या ठेवता येईल. एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत प्रभागाची लोकसंख्या या किमान किंवा कमाल मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त असल्यास त्याचे कारण प्रभाग रचनेच्या प्रस्तावात नमूद करणे आवश्यक राहील. प्रभाग रचना सुरु करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. शेवट दक्षिणेत करावा. यानुसार दिघ्यापासून प्रभाग बदलांना सुरुवात होणार आहे. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने द्यायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजेत. सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्व्हेनंबर यांचे उल्लेख यावेत. ५ ऑक्टोबरपासून कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश असून हा आराखडा तयार होताच आयोगाला तात्काळ ईमेलद्वारे अवगत करणे गरजेचे असल्याचे आदेशात नमुद केले आहे. त्यामुळे नव्याने प्रारुप प्रभाग रचना व मतदारयादी बनविण्यासाठी बुधवारपासून महापालिका निवडणुक विभागही कामाला लागला आहे.
- अधिकारी तीन प्रभाग कशापद्धतीने जुळवतात यावरच सारा खेळ अवलंबून आहे. प्रभागरचना सोईस्कर पद्धतीने व्हावी म्हणून सर्वच पक्ष जरी दबाव आणत असले तरी आयुक्त आणि निवडणूक अधिकारी कशा पद्धतीने प्रभाग रचना करतात यावर प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला ‘विजय’ मिळणार आहे. त्यादृष्टीने जुळवा-जुळवीसाठी नेते आणि अधिकारी यांच्या भेटी-गाठी वाढल्या आहेत.
- प्रारुप मतदार यादी - १ नोव्हेंबर २०२१.
हरकती, सूचना, दावे स्विकारणार - ३ नोव्हेबरपर्यंत.
मतदार यादी प्रसिद्ध - ५ जानेवारी २०२२.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Irfan shaikh