Breaking News
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय बैठका
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेसाठी राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिल्यानंतर ही रचना आठवडाभरात जाहीर होणार आहे. निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्व पक्षांचे प्रमुख उमेदवार कार्यरत झाले आहेत.
यंदा पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने पालिका निवडणूक होत असल्याने आजूबाजूच्या दोन उमेदवारांना सोबत घेऊन काम करण्याची व्यूहरचना आखली जात आहे.
या मित्रपक्षामध्ये विभिन्न पक्षाच्या तीन उमेदवारांनी बैठकींचा धुमधडका सुरू केला आहे. त्यासाठी पनवेल, उरण, कर्जत येथील फार्महाऊसला प्राधान्य दिले जात आहे. नवी मुंबई पालिका प्रशासकांनीही निवडणूक घेण्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाले असून सर्व कार्यक्रम ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेला दिला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून आपल्या प्रभागाजवळचा मित्रपक्ष शोधण्याचे काम सुरू आहे.
बहुसदस्यीय पद्धतीने या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या आपोआपच कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरात तीन नगरसेवकांचा मिळून एक असे ४० प्रभाग, तर दोन नगरसेवकांचा मिळून एक प्रभाग असे एकूण ४१ प्रभाग होणार आहेत. प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याची मुदत वाढवून बुधवार, २४ नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे.
अमरिश पटनिगिरे, उपायुक्त, महापालिका
रिपोर्टर