Breaking News
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या प्रारुप प्रभाग रचनेच्या हरकती , सूचनांवर १७ फेब्रुवारीला सुनावणी
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ ची प्रारूप प्रभाग रचना ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मा. राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केल्याप्रमाणे ०१ ते १४ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या.
या कालावधीत नागरिकांकडून प्राप्त हरकती व सूचनांवर मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या ०३ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या आदेशानुसार १७ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनावणी आयोजित करण्यात आलेली आहे. ही सुनावणी घेण्यासाठी मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मुंबई यांना राज्य निवडणूक आयोगाकडून प्राधिकृत करण्यात आलेले आहे. ते मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग व मा. जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा यांच्या उपस्थितीत नागरिकांनी सादर केलेल्या हरकती / सूचनांवर सकाळी ९.०० वाजल्यापासून ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथे सुनावणी घेण्यात येणार आहे.
विभाग कार्यालयामार्फत सदर सुनावणीकरिता हजर राहण्यासाठी संबंधितांना सूचनापत्र देण्यात येत आहे. हरकत/सूचनाधारकांनी सूचनापत्रात नमूद केलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी आपले प्राप्त झालेले सूचनापत्र व हरकती / सूचनांसह सुनावणीकरिता उपस्थित रहावयाचे आहे. फक्त हरकती /सूचनाधारकास सुनावणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल, याची नोंद घ्यावयाची आहे. जे हरकती/सूचनाधारक त्यांना दिलेल्या निश्चित वेळेस उपस्थित राहणार नाहीत किंवा गैरहजर राहतील त्यांची हरकत/सूचना एकतर्फी निकाली काढण्यात येईल, याची नोंद घ्यावयाची आहे.
ज्या हरकती/सूचनाधारकांना विभाग कार्यालयामार्फत सूचनापत्र मिळाले नसेल अशा हरकती / सूचना धारकांनी १६ फेब्रुवारी २०२२ रोजी, सकाळी ९.०० वा. पासून ते रात्री १०.०० वा. पर्यत त्यांनी ज्या ठिकाणी हरकत/सूचना दाखल केली होती अशा विभाग कार्यालय / मुख्यालय निवडणूक विभाग अशा ठिकाणाहून आपल्या हरकती / सूचनेची स्थळप्रत घेऊन व्यक्तीशः संपर्क साधावा व सूचनापत्र उपलब्ध करून घ्यावे असे सूचित करण्यात येत आहे.
कोव्हीड - १९ प्रतिबंधात्मक नियमावलीच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा तसेच सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत सर्वानी काळजी घ्यावयाची आहे.
तरी सर्व हरकती/सूचनाधारकांनी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांना दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्र येथे उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
रिपोर्टर