Breaking News
सिडको कोव्हीड सेंटर व्यतिरिक्त , इतर कोव्हीड सेंटर बंद करण्याचा निर्णय
नवी मुंबई : सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत असून दैनंदिन कोरोना बाधितांची संख्याही एक आकडी असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड उपचारार्थ सुरु करण्यात आलेल्या सुविधांबाबत निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष बैठक घेतली. यामध्ये कोव्हीड परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत आगामी काळात कोव्हीडची लाट उद्भवल्यास खबरदारी म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेची सर्वोत्तम कोव्हीड सुविधा म्हणून नावजले गेलेले सिडको कोव्हीड सेंटर तसेच कार्यान्वित ठेवून उर्वरित कोव्हीड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, परिवहन व्यवस्थापक तथा नोडल अधिकारी योगेश कडुस्कर, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी निलेश नलावडे उपस्थित होते.
कोव्हीड प्रभावीत काळात नियमितपणे जागतिक व राष्ट्रीय स्थितीचा आढावा घेत तसेच राज्यातील मुंबईसह इतर शहरांची सद्यस्थिती विचारात घेऊन नवी मुंबईमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार कोव्हीड सुविधांमध्ये आवश्यकतेप्रमाणे वाढ करणे याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेने सतर्कतेने पुढाकार घेऊन कार्यवाही केली. तिसऱ्या लाटेची सज्जता करतानाही महानगरपालिका व खाजगी अशाप्रकारे एकूण १२ हजार बेड्सची उपलब्धता करून ठेवण्यात आली. यामध्ये विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेत जाणवलेली आयसीयू व व्हेन्टीलेटर्स सुविधेची कमतरता लक्षात घेता ती दूर करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात आली. ही वाढ करतानाही नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आयसीयू सुविधा निर्माण करून या रुग्णालयांचा कोव्हीड नंतरच्या काळातही पूर्ण क्षमतेने वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले व महानगरपालिकेची आरोग्य सेवा सक्षम करण्यात आली. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीडचा प्रभाव रोखण्यात महानगरपालिकेस यश लाभले.
उपचारांच्या उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याप्रमाणेच १११ इतकी मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्रे सुरु करून कोव्हीड लसीकरणाचे प्रमाणही सर्वोत्तम राखण्याकडे काटेकोर लक्ष देण्यात आले. त्यामुळे १८ वर्षावरील नागरिकांचा पहिला डोस १०० टक्के पूर्ण करणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महानगरपालिका ठरली. त्याचप्रमाणे १५ ते १८ वयोगटातील मुलांचाही पहिला डोस १०० टक्के पूर्ण करणारी पहिली महानगरपालिका नवी मुंबईच ठरली व आता १८ वर्षावरील १०० टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण कऱणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका लवकरच ठरेल.
सद्यस्थितीत कोव्हीडचा प्रभाव झपाट्याने कमी होताना दिसत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरी जीवन सुरळीत व्हावे यादृष्टीने अनेक सुविधा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आल्या आहेत असे समाधानकारक चित्र असले तरी कोव्हीडचा धोका पूर्णपणे टळलेला नाही याची गांभिर्याने दखल घेऊन दैनंदिन टेस्टींगचे प्रमाण 5 हजारापेक्षा कमी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी आरोग्य विभागास दिले.
कोव्हीड काळात निर्माण करण्यात आलेल्या उपचार सुविधांची कोव्हीड सेंटर ही महानगरपालिकेची समाज मंदिरे, सांस्कृतिक भवने अशा वास्तूंमध्ये निर्माण करण्यात आली होती. सदर वास्तू मध्ये नागरिकांना पुर्ववत कार्यक्रम करता यावेत यादृष्टीने तेथील आरोग्य उपकरणे व सुविधा काढून घ्याव्यात असेही निर्देशित करण्यात आले.
कोव्हीड बाधितांच्या आरोग्य स्थितीची दैनंदिन विचारपूस करून त्यांना दिलासा देणारे कॉल सेंटर तसेच विशेषत्वाने दुस-या लाटेत नागरिकांच्या बेड उपलब्धतेसाठी व त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध होण्याकरिता युध्द पातळीवर मदतकार्य करणारी वॉर रुम कोरोना बाधीतांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याने बंद करावी व त्यांच्यामार्फत केले जाणारे कोरोना रुग्णसंपर्काचे काम संबंधीत नागरी आरोग्य केंद्रामार्फत करण्यात यावे असे आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच इतरही विभागांनी कोव्हीड प्रभावीत काळात नागरिकांना दिलासा व समाधान देणारे काम केले असून नागरिकांनीही कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करून सहकार्य केलेले आहे. तथापी कोव्हीड अजून पूर्णत: संपलेला नाही याची दखल घेऊन जोपर्यंत शासन निर्देश येत नाहीत तोपर्यंत कोव्हीडच्या विषाणूपासून दूर राहण्यासाठी मास्कचा वापर नियमित करणे अनिवार्य आहे तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणेही स्वत: च्या व इतरांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. त्याचप्रमाणे १५ वर्षावरील नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस विहित कालावधीत घ्यावा आणि ज्येष्ठ नागरिकांनीही कोव्हीडचा प्रिकॉशन डोस घ्यावा आणि स्वत:ला लस संरक्षित करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
रिपोर्टर