Breaking News
कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यास आस्थापनांना पहिल्या वेळी ५० हजार दंड
दुसऱ्या वेळी ७ दिवसांसाठी बंदी व तिसऱ्या वेळी कोव्हीड संपेपर्यंत पूर्णत: बंदीचे आदेश जारी
सद्यस्थितीत दररोज मोठ्या प्रमाणात वाढत असलेली कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता कोरोना नियंत्रणासाठी मर्यादीत स्वरूपात बंधने लागू करणे महत्वाचे आहे हे लक्षात घेत कोव्हिड १९ प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सुधारित आदेश जारी केलेले आहेत.
या नवीन आदेशानुसार २७ मार्चच्या आदेशामधील काही बाबींवर कोव्हीड प्रादुर्भाव रोखण्याकरिता काही महत्वपूर्णा बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शॉपींग मॉलमध्ये दर शुक्रवारी ४ नंतर तसेच शनिवार व रविवार पूर्ण दिवस कोव्हीड टेस्टींग केल्याशिवाय प्रवेश प्रतिबंधित असेल असे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. यासोबतच कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहेच.
नवीन आदेशानुसार मॉलमध्ये योग्य सुरक्षित अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळल्यास पहिल्या वेळी रू. ५० हजार इतक्या रक्कमेचा दंड आकारण्यात येईल तसेच दुसऱ्या वेळी उल्लंघन झाल्यास ७ दिवसांकरिता मॉल बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल आणि तिसऱ्यांदा उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास केंद्र सरकारमार्फत कोव्हीड १९ महामारी संपल्याचे जाहीर होत नाही तोपर्यत शॉपींग मॉल्स पूर्णपणे बंद करण्याची कारवाई करण्यात येईल असे स्पष्टपणे आदेशित करण्यात आले आहे.
तसेच डी मार्ट , रिलायन्स फ्रेश , स्टार बझार यासारखे कन्व्हेनियन्स स्टोअर्स , डिपार्टमेंटल स्टोअर्स त्याचप्रमाणे सर्व चित्रपटगृहे , नाट्यगृहे , उपहारगृहे , बार आणि खुले लॉन्स , मंगल कार्यालये , सभागृहे , बॅन्क्वेट हॉल व इतर हॉल याठिकाणीही कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यास अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तरी संबंधित व्यवस्थपनांनी याची नोंद घ्यावी व कोव्हीड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
रिपोर्टर