Breaking News
विमा दाव्याचा झटपट निपटारा, आयआरडीएआयने लागू केला नवीन नियम
नवी दिल्ली : या वर्षाच्या सुरुवातीला विमा पॉलिसीशी निगडीत एक महत्वपूर्ण नियम लागू झाला आहे. या नियमानुसार, लोकांना आता नवीन विमा पॉलिसी घेताना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने हा नियम लागू केला आहे. हा नियम जीवन विमा, आरोग्य, ऑटो, घर आणि इतर सर्व प्रकारच्या विम्यासाठी लागू करण्यात आला आहे. या नियमामुळे आता विमाधारकाला अनेक फायदे मिळणार आहेत. तसेच कंपनीवरील ताणही कमी होणार आहे.
यापूर्वी विमा पॉलिसी खरेदी करताना ग्राहकांना केवायसी करणे अनिवार्य नव्हते. विमा खरेदी करणाऱ्या व्यक्तीची इच्छा असेल तरच केवायसी करण्यात येत होता. त्यासाठी कोणतेही बंधन नव्हते. केवायसी अपडेट न केल्यास ग्राहकाला कोणतेही नुकसान होत नव्हते. त्याला केवायसीचा आग्रह करण्यात येत नव्हता.
तज्ज्ञांच्या मते नवीन नियम आल्याने दाव्याची प्रक्रिया जलद गतीने होईल. दाव्याचा निपटारा पटकन होईल. विमा कंपनीलाही विमाधारकाची ओळख पटविणे सोपे होईल. केवायसीमुळे ग्राहकाशी संबंधित सर्व माहिती विमा कंपनीला मिळविणे सोपे होईल. केवायसीमुळे विमा कंपन्या विम्यासंबंधीच्या दाव्यातील त्रुटी लवकर दूर करु शकतील.
तज्ज्ञांच्या मते दावा निपटाऱ्याची प्रक्रिया या नियमामुळे गतीमान होईल. कारण आता विमा कंपनीकडे ग्राहकाची सर्व अद्ययावत माहिती असेल. केवायसी नियमामुळे बोगस क्लेमची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच योग्य व्यक्तीलाच दाव्याची रक्कम मिळले.
आयआरडीएआयने एक महत्वपूर्ण प्रस्ताव तयार केला आहे. ज्यांनी कोविड काळात लसीचे दोन डोस आणि बुस्टर डोस घेतला आहे. त्यांच्यासाठी विमा पॉलिसीवर सवलत देण्याचा विचार करण्याचा आग्रह धरला आहे. पीटीआयच्या दाव्यानुसार, कोविडसंबंधीत जीवन आणि इतर विमा पॉलिसींचा दावा पटकन निकाली काढण्यासही सांगण्यात आले आहे.
नियामक प्राधिकरणाने विमाधारकाला कोविड काळात उपचारासंबंधीचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्याची प्रक्रिया राबविण्याचे सांगण्यात आले आहे. कोविड काळातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी एक वॉर रुम तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
रिपोर्टर