Breaking News
नवी मुंबई महानगरपालिका लोकसहभागातून राबविणार ‘ स्वच्छ दिवाळी ,शुभ दिवाळी ’ अभियान
नवी मुंबई : स्वच्छता आणि सुशोभिकरणामध्ये आघाडीवर असणारे शहर ही नवी मुंबईची ओळख असून ती सातत्यपूर्ण कामांमुळेच दृढ झालेली आहे. काही दिवसांवर आलेल्या दिवाळी या देशातील सर्वात मोठ्या सणाच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकारच्या सहसचिव तथा स्वच्छ भारत मिशनच्या संचालक श्रीम. रूपा मिश्रा यांनी राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या वेबसंवादामध्ये ‘ स्वच्छ दिवाळी , शुभ दिवाळी ’ ही नवी मोहीम दीपावली कालावधीत राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यास अनुसरून आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने त्वरित नियोजन करीत प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने दिवाळी कालावधीच्या आधीपासूनच विविध उपक्रम राबविण्याच्या अंमलबजावणीस सुरूवात केलेली आहे.
‘ स्वच्छ दिवाळी , शुभ दिवाळी ’ ही मोहीम राबविताना स्वच्छतेमधील अत्यंत महत्वाचा म्हणजे स्वच्छतेची प्रत्यक्ष कृती करणारा घटक अर्थात स्वच्छतामित्रांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना मास्क वितरित करण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते सफाईकर्मींना प्रातिनिधिक स्वरूपात मास्क वितरण करून या कार्यवाहीला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी आयुक्तांनी काम करताना मास्कचा वापर करण्याचे आवाहन स्वच्छताकर्मींना केले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय गडदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. सर्व सफाईकर्मींना मास्क वितरित केले जात आहेत.
‘ स्वच्छ दिवाळी , शुभ दिवाळी ’ या मोहीम अंतर्गत शासनामार्फत प्राप्त सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये दिवाळी स्वाक्षरी मोहीम , प्लास्टिक प्रतिबंध व पर्यायी कापडी पिशव्या वापरण्याविषयी व्यापक जनजागृती व मोहीम, इकोफ्रेंडली लोकल प्रॉडक्ट्सचा वापर असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याबाबतचे नियोजन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन ‘ स्वच्छता हीच लक्ष्मी ’ अशी आपली भारतीय परंपरेची शिकवण लक्षात घेऊन शहर स्वच्छतेत योगदान द्यावे असे आवाहन आयुक्तांमार्फत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे दिवाळीपूर्वी आपल्या घराची साफसफाई करताना नागरिकांनी आपल्याला नको असलेल्या, टाकून देणार आहात अशा वस्तू नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ९२ ठिकाणी उभारलेल्या ‘थ्री आर’ सेंटरमध्ये आणून ठेवाव्यात जेणेकरून त्या गरजूंपर्यंत पोहचून त्यांची दिवाळी आनंदात जाईल असेही आवाहन नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे..
रिपोर्टर