Breaking News
सीताराम म्हात्रे फाऊंडेशनचा दुसरा वर्धापनदिन मोठ्या दिमाखात साजरा
सीताराम म्हात्रे फाऊंडेशन, कोपरखैरणे, नवी मुंबई या संस्थेचा दुसरा वर्धापनदिन दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी शुक्रवारी एफ जी नाईक महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी वर्धापनदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. राजेश करंकाळ, इंग्रजी विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष एफ.जी. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक व व्यावसायिक बांधकाम क्षेत्रातील नामवंत श्री सुधाकर म्हात्रे उपस्थित होते. सीताराम म्हात्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री चंद्रकांत म्हात्रे, सचिव सौ एकादशी म्हात्रे, सहसचिव चंद्रकला म्हात्रे, खजिनदार ग्रीष्मा पाटील, कार्यकारिणी सदस्य सौ अरुणा पाटील आणि श्री काळुराम म्हात्रे तसेच इतर सभासद आणि विद्यार्थीवर्ग उपस्थित होते .
या सोहळ्याप्रसंगी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सीताराम म्हात्रे फाऊंडेशन तर्फे शिष्यवृत्ती देण्यात आली. याशिवाय “We the PAP । आम्ही प्रकल्पग्रस्त” या द्विभाषिक मॅगझिनच्या संपादकीय मंडळाचे नेमणूक पत्र प्रा. डॉ. राजेश करंकाळ यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच गेली चार दशके प्रकल्पग्रस्तांसाठी गृहनिर्माण क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या श्री सुधाकर म्हात्रे फाऊंडेशनच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रमात फाऊंडेशनच्या सहसचिव प्रा. चंद्रकला म्हात्रे यांच्या "Contemporary Development Trends in India" पुस्तकाचे आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत म्हात्रे यांच्या "One Hundred Poems of Chokha Mela: Bilingual Edition" पुस्तकाचे प्रा. डॉ..राजेश करंकाळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ..राजेश करंकाळ यांनी आपल्या भाषणात प्रकल्पग्रस्तांच्या विस्थापनाचे विश्लेषण करताना स्थानिकांचे आर्थिक तसेच सामाजिक व सांस्कृतिक जीवन कसे बदलले आहे ह्याचे विस्तृत विवेचन केले. प्रकल्पग्रस्तांच्या ह्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी “We the PAP । आम्ही प्रकल्पग्रस्त” त्रैमासिक हे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, शासकीय प्रकल्पांना कोणताही विरोध नसून लोकांचा विश्वास संपादन करून, शिवाय योग्य मोबदला देऊन लोकांना प्रकल्पात सामावून घेण्याचे आवश्यक आहे असे मत त्यांनी ह्यावेळी मांडले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री प्रताप महाडिक यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना फाऊंडेशनच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती साठी तसेच इंग्रजी संभाषण वर्ग, भाषांतर प्रशिक्षण अभ्यासक्रम इत्यादी मोफत कोर्सेस उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले व इतर उपक्रमांची माहिती करून दिली व अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमात सामील होण्याचे आवाहन केले.
सीताराम म्हात्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत काळूराम मात्रे यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या सद्यस्थितीबद्दलचे गैरसमज व वस्तुस्थिती ह्यामध्ये किती तफावत आहे ह्यावर प्रकाश टाकून प्रकल्पग्रस्तांच्या अस्सल जीवनाची ही वस्तुस्थिती शासन, अभ्यासक व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी फाऊंडेशनचे त्रैमासिक “We the PAP । आम्ही प्रकल्पग्रस्त” अचूकपणे कार्य करेल याची ग्वाही दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाऊंडेशनच्या सहसचिव प्रा.चंद्रकला म्हात्रे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन ह.भ.प. सौ काजल म्हात्रे यांनी केले
रिपोर्टर