दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
- by Santosh Jadhav
- Nov 21, 2024
दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडेल तर दहावीच्या परीक्षेसाठी २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आला असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.
त्यानुसार यंदा ऑगस्ट महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तसेच वेळापत्रका संदर्भात काही हरकती सूचना असतील तर त्या २३ ऑगस्टपर्यंत राज्य मंडळाने मागविल्या होत्या. प्राप्त सूचनांवर विचार करून राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आल्याचे आता दिसून येत आहे.
बारावीच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्या आठवड्यात आणि दहावीच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातात. संबंधित परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणत जुलैच्या तिसर्या आठवडयापासून घेतली जाते.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा सारासार विचार करता सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावी-बरावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक
बारावी लेखी परीक्षा - ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५
बारावी - प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा - २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५
दहावी लेखी परीक्षा - २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५
दहावी - प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा - ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Santosh Jadhav