Breaking News
विशेष अभियानांतर्गत शौचालय सुधारणांसह विविध उपक्रमांचे आयोजन
‘स्वच्छ भारत मिशन २.० शहरी’ अंतर्गत ‘स्वच्छ शौचालय अभियान २०२४’ जाहीर करण्यात आले असून स्वच्छतेला महत्व देणाऱ्या नवी मुंबई शहरामध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ शौचालयाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
यामध्ये संपूर्ण शहरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची सखोल स्वच्छता करण्यात येत असून नागरिकांमध्येही सार्वजनिकरित्या वापरली जाणारी शौचालये व घरगुती वापरातील शौचालये यांचा आरोग्यपूर्ण वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत स्वच्छ शौचालय मोहीम ही सर्वाची सामुहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करीत घनकचरा व्यवस्थापन विभागासोबतच सर्वच विभागांनी यात जागरुकतेने सहभागी होण्याचे निर्देश दिले. आठही विभागांसाठी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागीय क्षेत्रातील शौचालयांच्या स्वच्छतेची व सुस्थितीची पाहणी करावी व आवश्यक त्या उपाययोजना त्वरित करुन घ्याव्यात असे निर्देश दिले.
शौचालय स्वच्छतेचे काम करणाऱ्या स्वच्छतामित्रांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने चांगले काम करणाऱ्या स्वच्छतामित्रांचा अभियानांतर्गत सत्कार करण्यात येत असून या माध्यमातून ते करीत असलेल्या कामाबद्दल आदर व्यक्त केला जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने ओला, सुका व घरगुती घातक कचरा वर्गीकरणाचा संदेश जनमानसात प्रसारित करण्यासाठी शुभंकर (मॅस्कॉट) तयार केले असून ते लोकांमध्ये व त्यातही लहान मुलांमध्ये लोकप्रिय होत आहेत. अशाच प्रकारचा ‘यूज टॉयलेट’ अर्थात ‘शौचालयाचा वापर करा’ असा संदेश लिहिलेला शुभंकरही (मॅस्कॉट) तयार करण्यात आला असून अभियान काळात तो वर्दळीच्या ठिकाणी जाऊन शौचालय वापराविषयी लोकांमध्ये जनजागृती करीत आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
या अनुषंगाने लवकरच एक कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून याशिवाय 22 डिसेंबर रोजी पाम बीचवर होणाऱ्या ‘स्वच्छ नवी मुंबई मॅरेथोन’ मध्येही शौचालय वापराविषयी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
रिपोर्टर