राज्यात आठवडाभर ढगाळ वातावरण , उकाडा आणखी वाढणार
- by Vikas Banpatte
- May 06, 2021
राज्यात आठवडाभर ढगाळ वातावरण , उकाडा आणखी वाढणार
विकास बनपट्टे
नवी मुंबई : कमी दाबाचे पट्टे आणि हवेच्या चक्रीय स्थितीमुळे राज्याच्या सर्वच विभागांत आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर काही भागांत दुपारपर्यत निरभ्र आकाश आणि त्यानंतर अंशत: किंवा सामान्यत: ढगाळ स्थिती राहील असा अंदाज आहे़.
तर दुसरीकडे या कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिणेपासून मध्य प्रदेशाच्या दरम्यान कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन त्याचप्रमाणे हवेच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचे सावट आहे.
गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडला आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली होती. राज्यातील पावसाळी वातावरण आणि मेघगर्जनेसह पावसाचे सावट आणखी आठवडाभर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोकणात तुरळक पावसाची शक्यता
कोकण विभागात आणखी एक दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून ९ मे पर्यत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात मात्र ९ मेपर्यत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वारा वाहून हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मुंबईत वैशाख वणव्याची धग
मुंबई शहर आणि उपगनरांमध्ये आतापासूनच वैशाख वणव्याचे चटके बसू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांत मुंबईतील तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यत पोहोचले आहे. पुढील आठवड्यात तापमान ३६ अंशांच्या पुढे जाईल , असा अंदाज आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना आणखी उकाडा सहन करावा लागणार आहे.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Vikas Banpatte