स्टॅन स्वामींच्या निधनाचे जागतिक पडसाद
- by Saptahik Kokan Samana
- Jul 10, 2021
स्टॅन स्वामींच्या निधनाचे जागतिक पडसाद
मानवाधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते धर्मगुरू स्टॅन स्वामी यांच्या निधनाचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले आहे. स्टॅन स्वामी यांच्या निधनावर संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार परिषद आणि युरोपीयन संघाने दु:ख व्यक्त केले आहे.
‘मानवाधिकार कार्यकर्ते, धर्मगुरू स्टॅन स्वामी यांना दहशतवादाच्या खोट्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर नऊ महिन्यांनी त्यांचे कोठडीत निधन झाले. मानवाधिकार कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकणे स्वीकारार्ह नाही,’ असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाच्या मेरी लॉलर यांनी म्हटले आहे. याआधी त्यांनी स्वामींच्या ढासळत्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांच्यावर विशेष उपचार करण्याची मागणी केली होती. स्वामींविरोधातील आरोप खोटे असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
तर, ‘फादर स्टॅन स्वामी हे मूळ निवासींच्या हक्कांसाठी झटणारे ते कार्यकर्ते होते. त्यांना नऊ महिने ताब्यात ठेवण्यात आले होते. युरोपीय संघाकडून सातत्याने या प्रकरणी पाठपुरावा करण्यात येत होता,’ असे युरोपीयन संघाचे मानवाधिकार प्रतिनिधी इमॉन गिलमोर यांनी म्हटले आहे. दरम्यान, स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या टीकेला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिले असून, मानवी हक्कांची जपणूक योग्य रीतीने करीत असल्याचे म्हटले आहे. देशातील सर्व नागरिकांचे मानवी हक्कांचे संरक्षण करण्यास देश कटिबद्ध असून, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील मानवी हक्क आयोग आणि स्वतंत्र न्यायिक यंत्रणा त्यासाठी कार्यरत असल्याचे भारताने म्हटले आहे.
कोरेगाव भीमा-एल्गार परिषदेप्रकरणी बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) अटक झालेले ८४ वर्षाचे फादर स्टॅन स्वामी यांचे कोठडीत असताना सोमवारी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले होते. झारखंडमधील आदिवासीच्या हक्कासाठी फादर स्टॅन स्वामी यांनी लोकशाही मार्गाने अनेक आंदोलने केली होती. मागील आठ महिन्यांपासून फादर स्टॅन स्वामी जामिनासाठी प्रयत्न करत होते. त्यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला होता.
संबंधित पोस्ट
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView

रिपोर्टर
Saptahik Kokan Samana