Breaking News
उरण एज्यूकेशन संस्थेविरोधात गुन्हा नोंदविण्याची पालकांची मागणी
उरण : उरण तालुक्यातील उरण एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज या संस्थेच्या विरोधात पालकाचे अनेक तक्रारी आहेत. या संस्थेच्या विरोधात पालक शिक्षक संघाने तसेच पालक वर्गांनी अनेकदा शासनाच्या विविध विभागात पत्रव्यवहार करूनही या शिक्षण संस्थेने शासनाच्या व न्यायालयांच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत आपला मनमानी कारभार चालूच ठेवला आहे. त्यामुळे उरण मधील सर्वच पालकवर्गानी त्रस्त होऊन संस्थेच्या मनमानी व भ्रष्ट कारभराविरोधात आवाज उठवत पालक वर्ग तसेच पालक शिक्षक संघाने उरण एज्यूकेशन शिक्षण संस्था (युईएस) विरोधात फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी उरण पोलीस ठाणे यांच्याकडे केली आहे.
कोरोना काळात माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निकालामध्ये व शासन निर्णयामध्ये फी अभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे निकालपत्र अडविता येणार नाही तसेच ठरलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम घेता येणार नाही. असे सूचित केले असतानाही उरण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजने ४५ हुन अधिक विद्यार्थ्याचे निकाल राखून ठेवले आहेत.तसेच ठरलेल्या शासन निर्णयापेक्षा जास्त फी विद्यार्थ्यांकडून वसूल केली जात आहे. यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पालकांनी तसेच पालक शिक्षक संघाने वारंवार विनंती करूनही निकालपत्र दिले गेले नाही.तसेच नियमबाह्य फी विद्यार्थी पालक वर्गांकडून वसूल केले जात आहे.याविरोधात पालकांनी पंचायत समिती,उरण व शिक्षण विभाग येथे वारंवार लेखी तक्रार करूनही सदर शिक्षण संस्थेवर कोणतेही कारवाई झालेली नाही. शेवटी पालक वर्ग तसेच पालक शिक्षक संघाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असून उरण एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या भ्रष्ट व मनमानी कारभारा विरोधात आवाज उठवत सदर शिक्षण संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्याना व पालकांना न्याय मिळणेकरिता उरण एज्यूकेशन संस्थाच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्याकरिता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे असे मत पालकांनी व्यक्त केले आहे.
रिपोर्टर