Breaking News
भटक्या विमुक्तांना जागेवर जातीचे दाखले द्या - सामाजिक कार्यकर्ते जानकिराम पांडे यांची मागणी
अमरावती : भटक्या विमुक्त जाती जमातीच्या नागरिकांना कागदपत्रे मिळण्यासाठी संबंधित निवासस्थानी कॅम्प लावून सर्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत दि. २ ऑगस्ट रोजी महसूल आयुक्त अमरावती यांचे कडे भारतीय आदिवासी भटके विमुक्त युथ फ्रंटचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य बेलदार समाज महासंघटनेचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय अलुतेदार - बलुतेदार विकास परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मा. जानकिराम पांडे यांचे नेतृत्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी व महसूल आयुक्त यांचे कडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
या बाबतीत सविस्तर असे की,भारतीय आदिवासी भटके विमुक्त युथ फ्रंट,अखिल भारतीय अलुतेदार बलुतेदार विकास परिषद व महाराष्ट्र राज्य बेलदार महासंघटने तर्फे अमरावती जिल्हाधिकारी व महसूल आयुक्तांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली की भटके विमुक्त जाती जमाती ह्या आपले बिऱ्हाड पाठीवर ठेऊन रोजगार व पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकंती करीत असतात. त्यामुळे वयोवृद्ध पासून तर कोवळ्या बालकांपर्यत कोणाचेच जन्म , मृत्यू , रहिवासी यांची नोंद होत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी ही सततची भटकंती होत असल्याने मिळेल तिथे राहणे, मिळेल ती जमीन कसने, हेच पिढ्यानपिढ्या होत आहे. मात्र, आज भटक्या विमुक्त जाती जमातीमधील मुले - मुली मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड करीत आहे. घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र नोंद नसल्याने कोणतेच कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने ही मंडळी त्रस्त आहे.
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील तालुक्यात भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वस्त्या आजही गावकुसाबाहेर आहे. यात प्रामुख्याने सरोदे, गोपाळ, बेलदार, भरवाड, पारधी, पांगुळ, वडार, लोहार, सिकलगर, नाथजोगी, गोसावी, बंजारा, धनगर, वंजारी, भोई, ओतारी, यासारख्या इतर अनेक जातींच्या वस्त्या आणि तांडा आहे. मात्र सरकारी योजना यांच्या पर्यत पोहचतचं नाही. त्याकरिता महाराष्ट्र भरातील भटक्या विमुक्तांना एकाच ठिकाणी एकाच वेळेस कॅम्प लावून भटक्या विमुक्त जाती जमातीच्या नागरिकांना रहिवासी दाखला , राशनकार्ड , शिधापत्रिका ) आधारकार्ड , निवडणूक ओळखपत्र , जातीचे प्रमाणपत्र , घराचे पट्टे , शेत जमिनीचे पट्टे , वनजमीन हक्क दावे निपटारा , निराधार , एकल महिलांना पेन्शन व प्रमाणपत्र योजना उपलब्ध करून देण्यात यावे.
हे सर्व प्रमाणपत्र , हक्क , अधिकार या सर्वानामिळून सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रश्न सुटण्यात यश मिळेल व ही सर्व मंडळी योग्य त्या प्रवाहात येईल आणि तात्काळ ही मागणी मंजूर करून अमलात न आणल्यास भारतीय आदिवासी भटके विमुक्त युथ फ्रंट, अखिल भारतीय अलुतेदार बलुतेदार विकास परिषद व महाराष्ट्र राज्य बेलदार महासंघटने तर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला, संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते जानकिरामजी पांडे यांचे सोबत निवेदन देतांना धनराज चौके, नामदेवराव मुंडे, पी.एस. मांजरे, संतोष चौके, डॉ.संजय भोंगरे, सीमाताई पाखरे, पवन चौके, ज्ञानेश्वर बिल्लेवार आदी शिष्टमंडळ उपस्थित होते.
निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, ओबीसी कल्याण मंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.
रिपोर्टर